कुसुमाग्रजनगरी साहित्यिकांनी दुमदुमली । नाशिकमध्ये ९४ व्या साहित्य संमेलनास सुरुवात.

        



          काल 3 डिसेंबर, शुक्रवार रोजी कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष व नाशिकचे पालकमंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रमुख अतिथी म्हणून लेखक व गीतकार जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्यागमंत्री सुभाष देसाई, जेष्ठ लेखक विश्वास पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उत्तम कांबळे तसेच अनेक कवी व लेखक उपस्थित होते.

           कोरोनाची खबरदारी म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच लोकांना प्रवेश दिला जात होता. कुंभनगरी नाशिकला सुरुवातीपासूनच साहित्याचा वारसा लाभला आहे. कुसुमाग्रज यांच्या निवास्थानापासून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बऱ्याच जणांनी सहभाग नोंदवला.

            संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ शास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर हे प्रकृतीच्या कारणामुळे उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु ऑनलाईन पद्धतीने त्यांचे भाषण संमेलन स्थळी दाखवण्यात आले. कौतिकराव ठाले पाटील यांनी जयंत नारळीकर उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून नाराजी व्यक्त केली.

            जावेद अख्तर यांनी सर्व साहित्यिकांना निर्भिडपणे लिहण्यास सांगितले. ते साहित्यिकांना संबोधित करताना म्हणाले की,
     जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख ।
          इतनी अंधेरी न थी रात पहले लिख ।

       नंतर जेष्ठ नेते छगन भुजबळ मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजकारण्यांच्या चुका सांगण्याचा साहित्यिकांना अधिकार आहे.  अशा प्रकारे साहित्य संमेलन 3 दिवस चालणार आहे. शक्य असल्यास अवश्य भेट द्या.