खरं अपंग कोण ? एकदा नक्की वाचा.

               


             संध्याकाळी कामावरुन घरी चाललो होतो. दिवसभर काम करुन खूप कंटाळा आला होता त्यामुळे आधीच खूप चिडचिड झाली होती आणि चौकातून जात असताना अचानक मागून आवज आला ''साहेब, सकाळ पासून उपाशी आहे काहीही खाल्ल नाहीये १० रू असतील तर द्या ?'' मी माग वळून पाहील तर त्या व्यक्तीचे कपडे फाटलेले होते व तो अतिशय किळसवाणा दिसत होता. मी त्याला विचारले १० रुपयात तू काय करणार आहेस ? दहा रुपयात तर पोट भरेल असं काहीही येत नाही. मला त्या व्यक्तीची दया आली व मी त्याला १०० रु नोट काढून दिली.

            तो व्यक्ती दिसायला अगदी हट्टा-कट्टा होता. मग माझ्या मनात एक विचार आला व मी त्या व्यक्तीला विचारले की "तू येवढा हट्टा कट्टा असताना काम का करत नाहीस ? तुला जर काम मिळतं नसेल तर मी देतो. आमच्या कंपनीमध्ये काही worker च्या जागा शिल्लक आहेत मी मॅनेजर कडे शिफारस करून तुला नोकरी मिळवून देतो." 

                मला मनोमन त्या व्यक्तीला आपल्यामुळे काहीतरी मदत होतेय त्याचा खूप आनंद झाला. पण तेवढ्यातच ती व्यक्ती म्हणाली "ओ साहेब, आपल्याला काम वगैरे काही जमत नाही हेच माझे रोजचे काम आहे. मला फक्त एवढंच जमतं, तुम्ही मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद पण मला कोणाचाही सल्ला नको आहे." त्या व्यक्तीची भाषा व बोलणे ऐकून मी जरा चक्रावलो. व पुन्हा घरी जाण्यास निघालो. 

                मला नंतर आमच्या कंपनीपासून जवळच घड्याळाचे दुकान असलेल्या एका अपंग व्यक्तीची आठवण झाली. त्यांना लहान असताना पोलिओ झाला होता त्यामुळे त्यांना पायाने अपंगत्व आले होते. तरी सुद्धा ते घड्याळ दुरुस्ती चे काम करत होते. एखादा माझ्या घड्याळाचा सेल संपला होता तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांच्यासोबत बोलणे झाल्यावर त्यांनी सांगितले की "मी अपंग आहे परंतु मला कोणावर बोझ बनून राहायचं नाही म्हणून मी हा छोटासा व्यवसाय चालू केला." त्यांचे घर तेथून जरा लांब होते ते रोज सायकलवरून(पायाने अपंग असणाऱ्यांसाठी तीन चाकी असते ती हाताने चालवतात)  जाऊन येऊन करायचे. त्यांची ती स्वावलंबी होऊन जगण्याची उम्मेद पाहून त्यांच्याविषयी खूप आदर वाटला.

               वर मी मला भेटलेल्या त्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे वर्णन केले आहे. पहिल्याकडे सर्व काही होत पण त्याच्याकडे स्वावलंबी पणाने जगण्याची इच्छा नव्हती. आणि दुसरे त्या अपंग व्यक्तीला रोज जाण्यायेण्याच्या  येवढा त्रास होत होता तरीही त्याची स्वावलंबीपणाने जगण्याची इच्छा प्रबळ होती. यावरून माझ्या मनात एक विचार आला की या दोघांपैकी खरं अपंग कोण ? तो पहिला व्यक्ती जो विचाराने अपंग होता का तो जो पायाने अपंग असूनही अपंग नव्हता. तुमच्या मते कोण ?
                        - © वैभव पाटील, पुणे