मंगेश पाडगांवकर यांच्या चारोळ्या व कविता । mangesh padgaonkar charolya and poems । मंगेश पाडगांवकर

भातुकलीच्या खेळामधली
 राजा आणिक राणी 
अर्ध्यावरती डाव मोडला
 अधुरी एक कहाणी
- मंगेश पाडगांवकर

जिंकलो मी तरी हार झाली कशी ?
आतली ही फुले ठार झाली कशी ?
धावलो धावलो खेचले श्रेय मी
जिद्द माझी मला भार झाली कशी ?
- मंगेश पाडगांवकर

सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
- मंगेश पाडगांवकर

आतून आतून भिजल्याखेरीज रुजण नसतं आपलं,
कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं,
ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं !
- मंगेश पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची !
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा !
- मंगेश पाडगांवकर

झाडे झाली हिरवी गाणी
रूणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला
- मंगेश पाडगांवकर

वय वर्ष सोळा गं,
झाले हे भ्रमर पाहा
तुझ्याभोवती गोळा गं !
- मंगेश पाडगांवकर

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्यांना दिसणं,
सोनचाफ्याची फुलं वेचताना हातांचं सुगंधी होणं,
नंदा दिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुखं सुख म्हणजे नेमक काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.
- मंगेश पाडगांवकर


आंधळ्याची डोळसावर मात असते,
पेटलेली ज्योत त्याच्या आत असते !
- मंगेश पाडगांवकर

सत्याला शोधण्या निघाले,
 सत्य मिळाले नाही !
सत्य म्हणाले, "बाहेर नको",
आत आपुल्या पाही ! 
- मंगेश पाडगांवकर

डोळ्यांत जेव्हा आसवं असतात,
तेव्हाच माणसं माणसं असतात.
- मंगेश पाडगांवकर

प्रत्येकाची नजर निराळी,
प्रत्येकाचा घास वेगळा !
लाटांचे सौंदर्य न्याहाळी,
नदीकाठचा हुशार बगळा !
- मंगेश पाडगांवकर


नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे 
जेव्हा जेव्हा तिची नी माझी चोरूनी भेट झाली,
झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली !
- मंगेश पाडगांवकर

तू असतीस तर झाले असते,
आहे त्याहुनी हे जग सुंदर !
चांदण्यात विरघळले असते,
गगन धरेतील धुसर अंतर !
- मंगेश पाडगांवकर