आज वपुंचा जन्मदिवस यानिमित्ताने आपण त्यांचे काही निवडक विचार पाहुया । V P kale Quotes । वपु काळे विचार । वपुमय होताना । vapumay hotana

         आज 25 मार्च सर्वांचे लाडके वपु (पार्टनर) यांचा जन्मदिवस. या निमीत्ताने आपण वपु यांचे काही निवडक सुंदर विचार पाहूया.



आठवणी ह्या मुंग्याच्या वारूळाप्रमाणे असतात. वारूळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक अश्या असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसचं आहे.- व पु काळे
 
अधिकार मागायचे नसतात, ते मिळवायचे असतात.- व पु काळे
 
अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत.- व पु काळे
 
आपत्ती पण अशी यावी कि, त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडुन पडायचचं तर ठेच लागुन पडु नये. चांगलं दोन हजार फुटांवरुन पडावं. माणुस किती उंचावार पोहोचला होता हे तरी जगाला समजेल.- व पु काळे

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.- व पु काळे
 
आनंद ,समाधान, तृप्ती कृतज्ञ भाव, स्नेह ह्या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्याचं स्मगलिंग झालं असतं, इतकंच कशाला, त्याच्यावर Income Tax ही बसला असता. मग एकही माणूस साध हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून माणसं फुटली असती.- व पु काळे

आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो.- व पु काळे
 
ओळख वेगळी नि ओळखणं वेगळं.... ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो.... पण जवळची व्यक्ती कधीतरी अपेक्षेपेक्षा वेगळी वागते, तेव्हा "ओळख" आणि "ओळखणं" यामधला खरा फरक समजतो. - व पु काळे

समाजाला कळणार नसेल तर कोणतीही व्यक्ती कोणतही पाप करील.- व पु काळे

जमवून घेण्याची पाळी येण म्हणजेच कुठतरी मुळालाच धक्का. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते. अनपेक्षित-बारीक-सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देतांना तो एकटा असतो.- व पु काळे

संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही.- व पु काळे

स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. ज्याने-त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.- व पु काळे

आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं हि भावना सौख्यदायक असते.- व पु काळे

कोणतही समर्थन मूळ दु:खाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधयची, ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच.- व पु काळे

सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वत:चा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सदहेतुचीच शंका घेतली जावी, हा! - व पु काळे
 
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो.- व पु काळे

‘स्त्री’ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, ‘तुला बुध्दी हवी का सौंदर्य?’ तेव्हा स्त्री म्हणाली, ‘बुध्दीची गरज नाही, सौंदर्यच दे!’ ‘का?’ ‘बुध्दीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवतायेत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुध्दी विकत घेता येते.’- व पु काळे