रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळतें!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचें पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेनें दूर पळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयांत जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आतां धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळतें!
सह्यगिरींतील वनराजांनो या कुहरांतुनि आज पुढें
रक्त हवें जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव करा हिमाचल लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते
रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळतें!
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरांत तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते
रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळतें!
- कुसुमाग्रज (हिमरेषा)
अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇
मराठी कविता, Marathi Kavita, Marathi Sahitya, Marathi Poems, मराठी साहित्य, कुसुमाग्रज, kusumagraj, कुसुमाग्रज कविता, kusumagraj poems, kusumagraj Kavita.